‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा’ मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याबद्दलचा निर्णय कोर्टाने दिला आहे. याचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नाही. मात्र, राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ह्या निर्णयाचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे." असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली – “आगामी काळात देशात होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, आणि ओबीसी समाजाला एससी आणि एसटी प्रमाणे संविधानिक आरक्षण देण्यात यावे. यासाठी संविधानात सुधारणा करून ओबीसींचा त्यात समावेश करा.” अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नवी दिल्लत केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

    यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याबद्दलचा निर्णय कोर्टाने दिला आहे. याचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नाही. मात्र, राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ह्या निर्णयाचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. त्यामुळे देशभरातील सर्व ओबीसींनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. आगामी काळात देशात जनगणना होणार आहे. ही जनगणना होत असताना ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना घटनेने आरक्षण दिले आहे. त्याच पद्धतीने ओबीसींच्या आरक्षणाला घटनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे यासाठी घटनेत सुधारणा करावी.” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

    यापुढे बोलताना ते म्हणाले की, “काल पासून मी देशातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेत आहे. काल लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली त्याचपद्धतीने देशातील अनेक महत्वाचे पदाधिकारी येथे उपस्थित होते.”

    महाराष्ट्रात आगामी काळात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मात्र, या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी दोन दिवसांपुर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सुप्रीम कोर्टाने प्रायोगिक आकडेवारीची (इंपेरिकल डेटा) मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती माहिती अद्याप दिली नाही. केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. असं मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले.