अनेकांची दृष्टी गेल्याचा डॉक्टरांचा दावा; कोरोनामुक्त लोकांना ‘फंगल इन्फेक्शन’

कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या बऱ्याच लोकांना एका दुर्मीळ आणि प्राणघातक 'फंगल इन्फेक्शन' झाल्याचे आढळून आले आहे. असा दावा दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केला आहे.

दिल्ली: एकीकडे, भारतासह संपूर्ण जगाला कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे, कोरोनामुळे इतर आजारांचा धोका वाढत चालल्याचे उघडकीस आले आहे. कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या बऱ्याच लोकांना एका दुर्मीळ आणि प्राणघातक ‘फंगल इन्फेक्शन’ (fungal infections)झाल्याचे आढळून आले आहे, असा दावा दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केला आहे. फंगल संक्रमण झालेल्या जवळपास अर्ध्या लोकांची दृष्टी गेल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. गेल्या १५ दिवसांत रुग्णालयातील डोळा-नाक-घसा (ईएनटी) डॉक्टरांकडे अशी १३ प्रकरणे आली आहेत.  ही चिंताजनक आणि दुर्मीळ समस्या आहे, पण ती नवीन नाही. कोविड -१९मुळे होणारे फंगल संक्रमण हे नवीन आहे. गेल्या १५दिवसांत कोविड -१९ च्या फंगल संसर्गाची १३ प्रकरणे ईएनटी चिकित्सकांकडे आली असून त्यातील ५० टक्के रुग्णांनी आपली दृष्टी गमावली आहे, असे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे.

‘मॉडर्ना’ कंपनीच्या डेटावर सायबर हल्ला

अमेरिकन औषध कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आणखी एक औषध कंपनीच्या डेटा सेंटरवर हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात काही महत्त्वाची माहिती, दस्ताऐवज चोरीला गेल्याचे कंपनीने सांगितले आहे. मॉडर्ना कंपनीनेदेखील कोरोनावर लस विकसित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर हल्ल्याबाबत कंपनीलादेखील माहिती नव्हती. सायबर हल्ल्याची माहिती युरोपीयन मेडिसिन एजन्सीने (ईएमए) पहिल्यांदा दिली. कंपनीकडून सरकारकडे लस मंजुरीसाठी दस्ताऐवज पाठवले होते. या दस्ताऐवजांवर सायबर हल्लेखोरांनी डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. या आधीदेखील लस विकसित करणाऱ्या काही कंपन्यांचा लस चाचणी आणि त्याच्याशी संबंधित डेटा चोरीला जाण्याची, हॅक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. फायजर आणि बायोएनटेक कंपनीवरदेखील सायबर हल्ल्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते.

इंग्लंड, जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी काही देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या नव्या प्रकारामुळे बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली असून लॉकडाउन लागू केला आहे. याचबरोबर, जर्मनीमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली. आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी हाईस ऑफ कॉमन्समध्ये म्हटले की, लंडन आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोना बाधितांची संख्या सात दिवसांमध्ये दुप्पट झाली आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता होती. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी लंडन आणि जवळपासच्या परिसरात तिसऱ्या पातळीवरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचबरोबर, जर्मनीमध्ये १६ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.