रामदेव बाबांच्या वक्त्यव्यावर इतक्या भडकल्या होत्या डॉक्टर संघटना; आयएमएच्या नोटीशीनंतर पतंजलीचे स्पष्टीकरण

ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझ्मा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरले. फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्या, असे सांगताना रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, ॲलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावा रामदेव यांनी केला होता. यावर आयएमएने आक्षेप घेत संताप व्यक्त केला.

    दिल्ली : ‘ॲलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’, या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या योगगुरू रामदेव यांच्या बचावासाठी पतंजली योगपीठ पुढे सरसावले आहे. रामदेव यांना इंडियान मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर पतंजलीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आयएमएने केलेले आरोप पतंजली योगपीठाने फेटाळून लावले होते. रामदेव हे नेहमीच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आदर करतात, असे पतंजलीने म्हटले आहे.

    पतंजली योगपीठ ट्रस्टचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ताक्षरात हे स्पष्टीकरण आहे. रामदेव हे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अतिशय आदर करतात. कोरोना संकटाच्या या काळात ते दिवस-रात्र काम करत आहेत. आपल्याला आणि कार्यक्रमात आलेल्या इतरांना व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड झालेला एक मेसेज ते वाचत होते, असे पतंजलीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. रामदेव बाबांचे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्यांविरोधात कुठलाही चुकीचा हेतू नाही. त्यांच्याविरोधात जे काही आरोप करण्यात येत आहेत ते चुकीचे आणि निरर्थक आहेत, असे स्पष्टीकरणात म्हटले आहे.

    ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझ्मा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरले. फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्या, असे सांगताना रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, ॲलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावा रामदेव यांनी केला होता. यावर आयएमएने आक्षेप घेत संताप व्यक्त केला. एवढेच नाही, तर रामदेव बाबांनी अॅलोपॅथीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तसेच अज्ञानातून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.