Don't hesitate to discuss, a solution is needed Even on the tenth day of the agitation, the farmers were angry; India closed on December 8

दिल्ली :  कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा शनिवारी दहावा दिवस होता. दरम्यान, दिल्लीतील विज्ञान भवनात सरकारसोबत झालेल्या चर्चेत ४० शेतकरी सहभागी झाले. यावेळी शेतकरी मौन बाळगून होते. हो किंवा नाही असे उत्तर द्या. चर्चा नकोच, तोडगा हवा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. ८ डिसेंबरला भारत बंदचा इशाराही किसान संघटनांनी दिला आहे.

शनिवारीही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी बाणा कायम ठेवत सरकारी पाहुणचारास नकार दिला व सोबत आणलेले जेवणच घेतले. सरकारतर्फे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य मंत्री सोमप्रकाश यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तथापि शेतकऱ्यांनी आता चर्चा नव्हे तर तोडगा हवा असे सरकारला सुनावतानाच केवळ विश्वास आणि समाधानाचीच गरज आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने गेल्या बैठकीत झालेल्या मुद्यांवर लिखित उत्तरही सादर केले.

लिखित हमी देण्यास सरकार तयार

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना हमी भाव देणे सुरूच ठेवण्याची लिखित हमी देणे आणि कृषी कायद्यातील ज्या कलमांवर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे त्यात दुरुस्ती करण्याची तयारीही सरकारने दर्शविली आहे. परंतु शेतकरी मात्र तीनही कायदे मागे घेण्यावरच अडून बसले आहेत.

बैठकीपूर्वीही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यात परिवर्तन केल्याने साध्य काहीच होणार नसून हे तीनही कायदेच रद्द करण्याची मागणी केली होती. यापूर्वी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावर चार मंत्र्यांसोबत चर्चा केली. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल उपस्थित होते.

…तर यमुना एक्स्प्रेस वे ठप्प करण्याचा इशारा

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेले शेतकरी माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पंजाब व हरयाणाच्या शेतकऱ्यांसह उत्तर प्रदेशातील शेतकरीही आंदोलनावर ठाम आहेत. आरपारची लढाई लढण्याच्या उद्देशानेच हे शेतकरी येथे आलेल्या या शेतकऱ्यांनी आता रोज चर्चा होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. काही शेतकऱ्यांनी नोएडा ते आग्राकडे जाणारा यमुना एक्स्प्रेस वे ही ठप्प करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय किसान युनियनच्या (टिकैत गट) नेत्यांनी केंद्र सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास यमुना एक्स्प्रेस वे ठप्प करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी जोपर्यंत भारत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत दिल्ली सीमेवरच ठाण मांडणार असल्याचे स्पष्ट केले.