माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजींचं निधन, कोरोनामुळे ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माध्यमांच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ही सोराबजी यांची ओळख होती. माध्यमांच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला,तेव्हा तेव्हा ते माध्यमांच्या बाजूने कोर्टात लढले. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त सोराबजी यांची कारकीर्द सुरू झाली १९५३ साली. मुंबई उच्च न्यायालयापासून त्यांच्या वकिलीचा प्रवास सुरू झाला. 

    भारताचे माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोराबजी हे ९१ वर्षांचे होते.

    माध्यमांच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ही सोराबजी यांची ओळख होती. माध्यमांच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला,तेव्हा तेव्हा ते माध्यमांच्या बाजूने कोर्टात लढले. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त सोराबजी यांची कारकीर्द सुरू झाली १९५३ साली. मुंबई उच्च न्यायालयापासून त्यांच्या वकिलीचा प्रवास सुरू झाला.

    १९७१ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सिनिअर काऊन्सिलपदी नियुक्ती झाली. तर १९८९ साली सर्वप्रथम देशाचे ॲटर्नी जनरल झाले. त्यानंतर १९९८ ते २००४ या कालावधीतही देशाचे ॲटर्नी जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागातही त्यांनी १९९८ ते २००४ या काळात काम पाहिलं.

    काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या उपचारांना त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.