शेतकरी आंदोलनाचा सोळावा दिवस, कृषीमंत्र्यांचं चर्चेचं आवाहन, शेतकरी भूमिकेवर ठाम

चर्चेच्या पाच फेऱ्यानंतर सरकारने दिलेले कायद्यात बदल करण्याचे आश्वासन मान्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाचा आज (शुक्रवार) सोळावा दिवस आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चा करण्याचं आवाहन केलंय.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज (शुक्रवार) सोळावा दिवस आहे. केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारने मात्र कायदे रद्द करायला तयार नसल्याचं सांगत त्या कायद्यातील आक्षेपार्ह मुद्द्यांवर विचार करण्याची तयारी असल्याची भूमिका कायम ठेवलीय.

चर्चेच्या पाच फेऱ्यानंतर सरकारने दिलेले कायद्यात बदल करण्याचे आश्वासन मान्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाचा आज (शुक्रवार) सोळावा दिवस आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चा करण्याचं आवाहन केलंय.

केंद्रीय कृषी कायदे रद्द करता येणार नाहीत, मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले बदल करायला केंद्र सरकार तयार असल्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडली होती. या मुद्द्यांचं पत्रही सरकारकडून आंदोलकांना देण्यात आलं होतं. मात्र कायदे रद्द करा हीच मूळ मागणी असल्यामुळे त्यात सुधारणा किंवा बदल करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आणि हे आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्र सरकारनं आमचं म्हणणं ऐकलं नाही, तर आम्ही रेल्वे ट्रॅक अडवून धरू, असा इशारा भारतीय किसान युनीयनचे अध्यक्ष बुटा सिंग यांनी दिलाय. तर शेतकऱ्यांनी अकारण विषय चिघळू न देता चर्चा करावी. सरकार आजही चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांनी हा बंद मागे घेऊन चर्चेची तयारी दाखवावी, असंही ते म्हणाले.