शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्गार ; आजपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचं आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. आंदोलनासाठी जंतर- मंतरवर रोज २०० शेतकऱ्यांना आंदोलन करता येईल. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकऱ्यांना जंतर- मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे.

    नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन करणार आहे. या शेतकऱ्यांना दिल्लीतल्या जंतर- मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे.त्यामुळे या आंदोलनाला आजपासून म्हणजेच २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. हे आंदोलन शेतकरी ९ ऑगस्टपर्यंत करतील.आंदोलनासाठी वेळही देण्यात आली आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही वेळ असेल. काही अटींवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापनानं शेतकऱ्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.

    कोरोना नियमाचे करावे लागणार पालन
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. आंदोलनासाठी जंतर- मंतरवर रोज २०० शेतकऱ्यांना आंदोलन करता येईल. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकऱ्यांना जंतर- मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे.

    पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिंघू सीमेवरून शेतकऱ्यांना जंतर-मंतर येथे आणलं जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे विरोधक सरकारला शेतकरी आंदोलनावरुनही घेरण्याचा प्रयत्न करतील. महागाई, कोरोना महामारी आणि कोरोनाने होणारे मृत्यू अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आता शेतकरी आंदोलनाचीही भर पडेल.