अधिकारी म्हणतात ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजारांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झालेय पण…

दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीएम-किसान योजनेद्वारे दिला जाणारा तिसरा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे महिन्याच्या पहिल्या १० ते १५ दिवसांत वळते केले जातात.

ही रक्कम एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली जाते. मात्र, डिसेंबर अर्धा संपत आला तरीही अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेले नाहीत. केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती.

आदेशच देण्यात आलेले नाही

कृषि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात या वेळचा ६ हजार रुपयांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. मात्र, आम्हाला वरून आदेश यायचा आहे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत.  हा पैसा एकरकमी टाकायचा आहे की टप्प्याटप्प्याने याबाबत सूचना येणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकरी आंदोलनामुळे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत. पीएम-किसान योजनेचे पैसे देण्यास होणाऱ्या विलंबाला हे देखील एक कारण असू शकते, असे म्हणाला.