केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; कृषी कायदे रद्द होईपर्यंत लढाई सुरुच राहणार शेतकऱ्यांचा इशारा

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हरयाणा आणि राजस्थानमधले शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. कृषी कायदे रद्द करा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलन चिघळणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. कारण शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे. इतकेच नव्हे तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जोपर्यंत मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं.

१२ डिसेंबरला राजस्थान हायवे आणि दिल्ली बॉर्डर जाम करणार.
१४ डिसेंबर रोजी एक दिवसाचं उपोषण केले जाणार आहे.,तसेच त्याच दिवशी धरणे आंदोलनही संपूर्ण देशभरात केले जाईल.

कडाक्याच्या थंडीत गेल्या १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हरयाणा आणि राजस्थानमधले शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. कृषी कायदे रद्द करा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आज विरोधी पक्षाच्या पाच नेत्यांचं शिष्टमंडळही राष्ट्रपतींना भेटले आहे त्यांनीही शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणारे कृषी कायदे रद्द करावेत अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य केली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.