शेतकरी घालणार संसदेला घेराव ! दिल्ली पोलिस, गुप्तचर विभाग अलर्ट मोडवर

या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, दिल्ली पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिस मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत आणखी किती अतिरिक्त निमलष्करी दलाच्या जवानांची गरज पडेल, यासह इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

    दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या सात महिन्यांपासून धरणेआंदोलन करणारे शेतकरी आता संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविली आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संसदेला घेराव घालतील, अशी माहिती दिल्‍ली पोलिस आणि गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

    या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, दिल्ली पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिस मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत आणखी किती अतिरिक्त निमलष्करी दलाच्या जवानांची गरज पडेल, यासह इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

    आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान काही शेतकरी नेत्यांची एका षडयंत्रांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत संसदेला घेराव घालण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना एकत्र आणता येईल की नाही?, याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर कसे आणता येईल, याबाबत मंथन करण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि गुप्तचर विभाग सतर्क झाले आहे.