आज शेतकऱ्यांचे उपोषण, हजारो शेतकरी सिंघू सीमेवर, युपी-हरियाणाच्या शेतकऱ्यांची वेगळी भूमिका

शेतकरी आज एक दिवसाचे उपोषण करणार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या उपोषणाला पाठिंबा दिलाय. स्वतः केजरीवालदेखील उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. या उपोषणासाठी दिल्लीच्या सीमेवर १० हजार शेतकरी पोहोचले आहेत. उपोषणासोबत मोठं आंदोलन सध्या दिल्लीच्या सिंघू सीमेवर होणार आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी सुरू झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता अधिक तीव्र होत चाललं आहे. आज (सोमवार) शेतकऱ्यांनी एक दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीच्या सिंघु सीमेवर दाखल होणार आहेत.

शेतकरी आज एक दिवसाचे उपोषण करणार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या उपोषणाला पाठिंबा दिलाय. स्वतः केजरीवालदेखील उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. या उपोषणासाठी दिल्लीच्या सीमेवर १० हजार शेतकरी पोहोचले आहेत. उपोषणासोबत मोठं आंदोलन सध्या दिल्लीच्या सिंघू सीमेवर होणार आहे.

एकीकडे हे उपोषण होतंय, तर दुसरीकडे हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातले शेतकरी केंद्र सरकारशी चर्चा करायला तयार झाल्याचं समजतंय. या राज्यातील शेतकरी संघटनांशी केंद्र सरकारसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर चर्चेत त्यांना समाधानकारक तोडगा मिळाला, तर ते उपोषणातून मागे हटू शकतात.

भाजपच्या वतीनं उत्तर प्रदेशात आजपासून किसान संमेलन सुरू होणार आहे. नव्या कृषी कायद्यांचे फायदे शेतकऱ्यांचं समजून सांगण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग केला जाणार आहे. आजपासून १८ डिसेंबरपर्यंत हे संमेलन चालणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

दरम्यान, या आंदोलनासंदर्भात देशातील इतर पक्षांशी चर्चा करण्याचं सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम शरद पवारांनी सुरू केल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. पवारांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कसे पडसाद उमटतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.