युनिटेक एमडीवर गुन्हा दाखल; अनेक ठिकाणी झाडाझडती

कॅनरा बँकेत सुमारे १९८ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास संस्था सीबीआयने युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) संजय चंद्रा, त्यांचे वडील रमेश आणि भाऊ अजयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

दिल्ली. कॅनरा बँकेत( Canara Bank) सुमारे १९८ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास संस्था सीबीआयने (CBI)युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) संजय चंद्रा, त्यांचे वडील रमेश आणि भाऊ अजयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नव्याने गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीबीआयने आरोपींच्या अनेक ठिकाणांवर झाडाझडतीही घेतली. संजय चंद्रा यांना शुक्रवारीच वैद्यकीय कारणामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर ४३ महिन्यांनंतर तिहार तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हापासूनच त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर शोधमोहीम राबविण्यात आली.

युनिटेकविरोधात Unitec) दिल्ली पोलिस, सीबीआय, ईडीसह इतरही काही तपास संस्था चौकशी करीत आहे. उल्लेखनीय आहे की, चंद्रा यांना २ जी स्पेक्ट्रम प्रकरणातही आरोपी बनविण्यात आले होते, मात्र ट्रायल कोर्टाने त्यांना मुक्त केले होते. चंद्रा यांच्या वैयक्तिक आणि कॉर्पोरेट हमीच्या आधारावर कंपनीने कर्ज प्राप्त केले, मात्र त्यानंतर रिअल इस्टेट बाजारात मंदी आल्यामुळे कंपनीने डिफॉल्टड सुरू केले, असा आरोप कॅनरा बँकेने केला आहे. युनिटेक कंपनी सध्या सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या वहीखात्यांचे फॉरेंसिक ऑडिट करण्यात आदेश दिले होते. या ऑडिटवरून कंपनीने निधी वळवून फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.