#trending – पंतप्रधान मोदी रोजगार द्या… बेरोजगारांना कोणताही धर्म नसतो, त्यांना असते फक्त एक पोट आणि रिकामा खिसा

गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत कोरोना काळातील 10 महिन्यात भारतातील 10,113 कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली होती. जर याचप्रमाणे देशातील कंपन्या बंद होत असतील तर रोजगार वाढणार तरी कसा? असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडले आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांसह अनेक विकसनशील देशांना कोरोनाने आर्थिक गर्तेत ढकलले आहे.

  दिल्ली : ‘मोदी रोजगार दो’ असा नवा ट्रेंड ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ना चोर, ना चौकीदार, साहेब मी तर बेरोजगार, असे ट्विट लोकांकडून केले जात आहे. ट्विटरवर पोस्ट करून रोजगार मिळविण्याची धडपड करत असलेल्या बेरोजगारांच्या मते, सरकारने परीक्षा आणि निकाल वेळेवर जाहीर करावे आणि आम्हाला दिलासा द्यावा. काहींनी हॅशटॅगवर ट्विट करीत, मोदींनी खोटे बोलून मत प्राप्त केल्याचा आरोपही केला आहे.

  आमचे पंतप्रधान डिजिटल इंडिया आणि इतर कामांमध्ये व्यस्त असतात. भारतीयांनी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी मजुरी करावी, असे त्यांना वाटते. मोदीजी असे कसे चालणार, रोजगार तर हवा ना, केव्हापर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष कराल, असे कुणाल कुशवाहा नामक एका यूजरने ट्विट केले आहे.

  तर, बेरोजगारांना कोणताही धर्म नसतो, त्यांना असते फक्त एक पोट आणि रिकामा खिसा, असे ट्विट एका वापरकर्त्याने केले आहे. ‘मोदी रोजगार दो’ या हॅशटॅगवरून देशातील बेरोजगार तरुण रोजगाराची मागणी करीत आहे. ट्विटरवर या हॅशटॅगला काही तासांच्या आत 20 लाख लोकांनी रिट्विट केले आहे. 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनाचे काय झाले?निवडणुकीत मोठमोठे आश्वासन देणारे सरकार रोजगाराच्या बाबतीत चुप का आहेत?, असे प्रश्न बेरोजगारांनी सरकारला विचारले आहे.

  संपूर्ण देशात सध्या बेरोजगारीने कळस गाठला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 7.8% पेक्षा कमी होते. मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावले. अनलॉकनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत असले तरी रोजगारनिर्मितीचा आकडा नीचांकावर आहे. वर्षभरात रोजगार गमावणाऱ्यांची संख्या पाचपटीने वाढली आहे.

  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2021 मधील कामगार सहभाग दर 40.5% होता, जो जानेवारी 2021 मध्ये नोंदवलेल्या 40.6% आणि फेब्रुवारी 2020 मध्ये 42.6% इतका कमी आहे. याचा अर्थ असा आहे की रोजगाराच्या मागणीत घट झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 40.53 कोटी लोक नोकरी करीत होते.

  तर, चालू आर्थिक वर्षात नोकरी करणाऱ्यांची संख्या 39.52 कोटी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 1 कोटी रोजगारात घट होण्याची शक्यता आहे. रोजगारातील 2.5% आणि बेरोजगारांच्या संख्येत 6.2% कमी असल्याचे दर्शवितो. याचा परिणाम श्रमशक्तीत 2.8% घसरण नोंदविली आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार(एनएसएसओ) सन 2017-18 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण मागील 45 वर्षात सर्वात कमी 6.1 टक्क्यावर पोहोचले होते.

  गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत कोरोना काळातील 10 महिन्यात भारतातील 10,113 कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली होती. जर याचप्रमाणे देशातील कंपन्या बंद होत असतील तर रोजगार वाढणार तरी कसा? असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडले आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांसह अनेक विकसनशील देशांना कोरोनाने आर्थिक गर्तेत ढकलले आहे.

  जगभरासह भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास धडपडत आहे. अशातच, केंद्र सरकारने कंपन्यांबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरित परिणाम झाला असेल, हे स्पष्ट होत आहे. यामुळे सरकारने आता रोजगारवाढीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.