भारतासाठी चांगली बातमी; ऑक्सफर्डची लस प्रभावी आणि स्वस्त

दिल्ली :  भारतासाठी चांगली बातमी आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

लसीचे दोन पूर्ण डोस दिल्यानंतर लस ६२ टक्के प्रभावी आहे. तर, सुरुवातीला अर्धा डोस आणि नंतर पूर्ण डोस दिल्यानंतर लस ९० टक्के प्रभावी असल्याचे आढळून आल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

लस चाचणीच्या डेटानुसार, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २३ हजार ७४५ जणांवर लस चाचणी करण्यात आली. यातील ८२ टक्के स्वयंसेवक १८ ते ५५ या वयोगटातील होते. येत्या काही दिवसांमध्ये या लसीला मंजुरी मिळेल असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे. त्याशिवाय लशीचे दरही कमी असणार आहेत. ऑक्सफर्डची लस ही फायझर, मॉडर्नापेक्षाही कमी दरात उपलब्ध होणार असल्यामुळे अनेक विकसनशील देशांचे या लशीकडे लक्ष लागले आहे.

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने उत्पादित करण्यात येत आहे.