
दिल्ली : भारतात लवकरच कोरोना लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. कोरोना लसीबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांवर आरोग्य मंत्रालयाने उत्तरे दिली आहेत. तसेच कोरोना लस घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची सूचनाही आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
कोरोनाची लस घ्यायची की नाही हे लस घेणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, लसीचा पूर्ण डोस घ्यावा अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
संसर्ग होऊन गेलेल्या लोकांनीही लसीचा पूर्ण डोस घ्यावा, कारण यातून चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांनाही दोन वेळा घ्यावी लागेल. पहिली लस दिल्यानंतर २८ दिवसांच्या अंतराने लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
भारतात सहा प्रकारच्या कोरोना लसींच्या चाचण्या सुरू आहेत. भारतात उपलब्ध लसही इतर देशांतील लसीइतकीच प्रभावी असेल, असे मंत्रालयाने सांगीतले.
आजाराची लक्षणे संपल्यानंतर १४ दिवसांनी म्हणजे पूर्ण संसर्गमुक्त झाल्यावर ही लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर ज्या व्यक्तीला लस दिली आहे. त्या बूथवरच अर्धा तास विश्रांती घ्यावी लागेल. साइड इफेक्ट झाले तर तेथेच कळतील. दुसरा डोस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागेल असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलेय.