आता चुकूनही हे ट्रॅफिक नियम मोडू नका; नायतर भरावा लागेल मोठा दंड

वाहतुक नियावलीचे उल्लंघन करणे आता जास्त महागात पडणार आहे. कार आणि दुचाकीचे नियम बदलले आहेत. यामुळे नियम मोडल्यास वाहनचालकांना मोठा दंड भरावा लागेल.

नवी दिल्ली : वाहतुक नियावलीचे उल्लंघन करणे आता जास्त महागात पडणार आहे. कार आणि दुचाकीचे नियम बदलले आहेत. यामुळे नियम मोडल्यास वाहनचालकांना मोठा दंड भरावा लागेल.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) दिल्ली सरकारनं कार आणि मोटारसायकल चालकांसाठी वाहतुकीचे नवीन नियम (New Traffic Rules) लागू केले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास ५०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दंड (Fine) भरावा लागू शकतो. दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं हे नवीन वाहतूक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नवीन नियमावली अंतर्गत कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीलाही सीट बेल्ट (Seat Belt) लावणे अनिवार्य आहे. मागे बसलेल्या व्यक्तींनी सीट बेल्ट लावला नसल्यास दंड भरावा लागणार आहे. तर, मोटारसायकलला (Bike) साईड मिरर (Side Mirror) असणं बंधनकारक आहे. साईड मिरर नसतील तर वाहन चालकाला दंड भरावा लागेल. हे दोन्ही नियम मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 (Motor Vehicle Act 1988) आणि सेन्ट्रल मोटर व्हेईकल अॅक्ट 1989 (Central Motor Vehicle Act 1989) मध्ये पूर्वीपासूनच आहेत; पण आता ते पुन्हा लागू करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारनेही वाहतुकीचे नवीन नियम लागू केले आहेत. नव्या मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दुप्पट ते पाचपट दंडाची रक्कम वसूल करण्याची तरतूद यात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं वाहतूक नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर अधिक रकमेचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.