imports And Exports

सहा महिन्यापासून निर्यातीत घट होत होती, सप्टेंबर महिन्यात निर्यातीत ५.२७ टक्के वाढ होत ती २७.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. तर या काळात आयातीत १९.६ टक्के घट होत ती ३०.३१ अब्ज डॉलरपर्यंत आली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामरीत अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. तसेच कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने आयात- निर्यातीवरही निर्बंध आले होते. कोरोना काळात निर्यात कमी झाल्याने उद्योगधंद्यांना फटका बसत होता. मात्र, आता सहा महिन्यानंतर निर्यातीत वाढ झाल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तांदूळ, औषधांपासून कॉफीची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशाचे अर्थचक्र हळूहळू रुळावर येत आहे.

गेल्या सहा महिन्यापासून निर्यातीत घट होत होती, सप्टेंबर महिन्यात निर्यातीत ५.२७ टक्के वाढ होत ती २७.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. तर या काळात आयातीत १९.६ टक्के घट होत ती ३०.३१ अब्ज डॉलरपर्यंत आली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच या महिन्यात व्यापारातील तोट्यातही घट झाली आहे. हा आकडा २.९१ अब्ज डॉलरपर्यंत आला आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११.६७ अब्ज डॉलर होता. तर गेल्या वर्षी निर्यात २६.०२ अब्ज होती.

या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान निर्यातीत २१.४३ टक्क्यांची घट झाली आहे. या काळात १२५.०६ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. तर आयातीत ४०.०६ टक्क्यांनी घट होत १४८.६९ अब्ज डॉलर झाली आहे. या काळात लोखंड, तांदूळ, तेल, फार्मा, डेअरी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. तर देशभरातून इंधनाची मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या आयातीत ३५.९२ टक्क्यांची घट होत ती ५.८२ अब्ज डॉलरवर आली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या आयातीतही घट झाली आहे. आता निर्यात वाढत असल्याने उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे.