‘आता सगळं संपलय’ … अफगाणिस्तानवरून परतलेल्या ‘त्या’ शीख खासदाराला अश्रू अनावर

आता सगळं संपलय', 'अफगाणिस्तानमध्ये गेल्या २० वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलंय. सगळं शुन्यावर आलंय', असे म्हणत अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.

    नवी दिल्ली: तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानाने आज सकाळी काबुलहून १६८ जणा भारतात परतले आहेत. या विमानात हिंदू शीख आणि अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. मात्र अफगाणिस्तानवरून परतलेल्या शीख खासदाराला मात्र तिथली परिस्थिती सांगताना अश्रू अनावर झाले.

    ‘आता सगळं संपलय’, ‘अफगाणिस्तानमध्ये गेल्या २० वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलंय. सगळं शुन्यावर आलंय’, असे म्हणत अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली. भारतात आज परतलेल्या विमानातच शीख खासदार नरेंद्रसिंह खालसाही परतले आहेत.

    गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचे हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली. या १६८जणांमध्ये अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही हजर होते. एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी नरेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी, अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, खासदार खालसा यांना अश्रू अनावर झाले.

    मागील २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. तर ८७ जणांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे.