भारतीय तपास यंत्रणांनी केले अपहरण; मेहुल चोक्सीचे आरोप

25 मे रोजी बेपत्ता झालेल्या चोक्सीला देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिका प्रशासनाने अटक केली होती. माझे सर्व व्यवसाय बंद केल्यानंतर, सर्व संपत्ती जप्त केल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा माझ्या अपहरणाचा प्रयत्न करतील, असा विचार मी कधीच केला नव्हता. मी याबद्दल नेहमी ऐकत होतो, पण मी कायदेशीर लढाई लढत असताना आणि अँटिग्वामधील नागरिकत्व हक्क असताना भारतीय तपास यंत्रणा या स्तरापर्यंत जातील, असे वाटले नव्हते.

    दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीने अँटिग्वामध्ये पोहोचताच भारतीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. डोमिनिकातून अँटिग्वामध्ये पोहोचल्यानंतर मेहुल चोक्सीने एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. ज्यामधून त्याने भारतीय तपास यंत्रणांनी अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या अपहरणाने आपल्या मनावर कायमची जखम दिली असल्याचेही त्याने म्हटले आहे. मी घरी परतलो आहे. पण माझ्यावर झालेल्या अत्याचाराने मनावर आणि शरिरावर कायमच्या जखमा दिल्या आहेत, असे चोक्सी ऑडिओ क्लिपमध्ये सांगत आहे.

    अशी अपेक्षा नव्हती…

    25 मे रोजी बेपत्ता झालेल्या चोक्सीला देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिका प्रशासनाने अटक केली होती. माझे सर्व व्यवसाय बंद केल्यानंतर, सर्व संपत्ती जप्त केल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा माझ्या अपहरणाचा प्रयत्न करतील, असा विचार मी कधीच केला नव्हता. मी याबद्दल नेहमी ऐकत होतो, पण मी कायदेशीर लढाई लढत असताना आणि अँटिग्वामधील नागरिकत्व हक्क असताना भारतीय तपास यंत्रणा या स्तरापर्यंत जातील, असे वाटले नव्हते.

    मी अनेकदा आपल्या प्रकृतीमुळे प्रवास करू शकत नसल्याचे सांगितले. चौकशी करायची असेल तर इथे या. झूम किंवा इतर माध्यमातून चौकशी करायची असेल तर मी उपलब्ध आहे. मात्र, या अमानवीय आणि धक्कादायक पद्धतीने करण्यात आलेल्या अपहरणाची मला अपेक्षा नव्हती, असे चोक्सीने सांगितले आहे.