उपचारासाठी भारत सोडला; मेहुल चोक्सीचा कोर्टात दावा

    दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी, पळपुट्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, मी भारतातून पळून आलो नाही. मी भारतीय कायद्याचे पालन करणारा नागरिक असून फक्त उपचारांसाठी देश सोडला होता. मी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, असे चोक्सीने डोमिनिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, डोमिनिकामधील हायकोर्टात चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित झाली आहे.

    मी कायदा पाळणारा नागरिक आहे. केवळ अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी मी भारत सोडला. भारतीय अधिकारी जे प्रश्न विचारतील, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी तयार आहे. ज्यावेळी मी देश सोडला तेव्हा माझ्या विरुद्ध कोणतेही वॉरंट नव्हते. तसेच मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे चौक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. डोमिनिकामधील न्यायालयीन कार्यवाही टाळण्याचा माझा कोणताही हेतू नाही. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यामुळे, मी यातून सुटेल अशी कोणतीही शक्यता नाही, असेही चोक्सीने कबुल केले आहे.

    सध्या चोक्सी डोमिनिकामधील तुरुंगात आहे. 23 मे रोजी तो अँटीग्वा आणि बरमुडामधून गायब झाला होता. त्यामुळे इंटरपोलने त्याच्याविरोधात यलो नोटीस जारी केली होती. त्याअंतर्गत डोमिनिकाममध्ये त्याला अटक करण्यात आली. आता भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, जानेवारी 2018 मध्ये चोक्सीने भारत सोडला होता. 13 हजार 500 कोटींचा पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी चोक्सी देश सोडून गेला होता. आणि तेव्हापासून तो अँटिग्वामध्ये राहत होता. 2017 मध्येच चोक्सीने अँटीग्वा आणि बरमुडाची नागरिकता घेतली होती. त्यानंतर चोक्सी कधीच भारतात आला नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने चोक्सीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.