लॉकडाऊनमुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या सहा टक्क्यांनी घटली – आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची माहिती

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आणि धुम्रपानाची सवय असलेल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका ४० ते ५० टक्के अधिक असतो. या व्यसनांमुळे फक्त फुफ्फुसे, हृदय आणि कर्करोगच होत नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

  दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, बऱ्याचदा गैरसोईला सामोरे जावे लागले. मात्र यासगळ्यात एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. गेल्या वर्षात लॉकडाऊनच्या काळात देशात तंबाखू (Tobacco ) सेवन व धूम्रपान करणाऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन(Dr harsh vardhan) यांनी द्वेळीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.


  भारतात दरवर्षी तंबाखू सेवन आणि धुम्रपानामुळे १३ लाख जणांचा मृत्यू होता. आकडेमोड करायची झाल्यास हे प्रमाण दिवसाला ३५०० इतके आहे. मात्र, गेल्या वर्षभरात देशातील धुम्रपान आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. यापूर्वी हे प्रमाण ३४.६ टक्के होते ते आता २८. ६टक्के इतके झाले आहे.

  ‘धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका’

  तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आणि धुम्रपानाची सवय असलेल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका ४० ते ५० टक्के अधिक असतो. या व्यसनांमुळे फक्त फुफ्फुसे, हृदय आणि कर्करोगच होत नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

  दहा दिवसात नव्या कोरोना रुग्णांमध्ये एक लाखांहून अधिक घट

  देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता २१ मे ते ३१ मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या ५० दिवसांतील हा २४ तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे.