स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ (covaxin) लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी

नवी दिल्ली : देशात एकाबाजूला दररोज कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सीन (covaxin) लसीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट (test report) समोर आला आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक (bharat biotech) आणि आयसीएमआरने (icmr) मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी (made in india) लसीची (vaccine) निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. कोरोना विषाणूमुळे जगणं मुश्किल झालेल्या या काळात कोव्हॅक्सीन लसीचा प्राण्यांवरील पहिल्या फेजच्या चाचणीचा रिपोर्ट खूपच उत्साहवर्धक आहे.

अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना विषाणूला रोखण्यासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे.

कुठल्याही लसीच्या निर्मितीला काही वर्ष लागतात. पण सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत काही महिन्यात यशस्वी लस निर्मितीचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा अत्यंत वेगाने जगभरात कोरोना विरोधात लस संशोधन सुरु आहे. लसीची मानवी चाचणी करण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राण्यांवर चाचणी केली जाते. त्याला प्री-क्लिनिकल चाचणी म्हणतात.

कोव्हॅक्सीन प्राण्यांवरील चाचणीत प्रभावी ठरली आहे. एकूण २० माकडांना प्रत्येकी पाच याप्रमाणे चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना लसीचे दोन डोस देण्यात आले. माकडांच्या एका गटाला प्लासीबो देण्यात आला. तीन अन्य गटांना तीन वेगवेगळया प्रकारचा लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस दिला.

१४ दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर सर्व माकडं विषाणूच्या संपर्कात आली. त्यानंतरच्या अभ्यासात लसीमुळे माकडांचे विषाणूंपासून संरक्षण झाल्याचे समोर आले. माकडांच्या शरीरात विषाणूंचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या तसेच नाक, गळा आणि फुफ्फुसांमध्ये विषाणूचा गुणाकार थांबला. लस दिलेल्या माकडांच्या हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीत न्यूमोनियाचे कुठलेही लक्षण आढळले नाही. लसीचे दोन डोस दिलेल्या प्राण्यांमध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. कोव्हॅक्सीन लस दिलेल्या प्राण्यांमध्ये कोरोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. हेच या चाचणीचे यश आहे.

हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -३ हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. कोव्हॅक्सीनचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट जाहीर करताना अभिमान वाटत असल्याचे भारत बायोटेकने टि्वटमध्ये म्हटले आहे.