महाराष्ट्रात सर्वाधिक थैमान: 24 तासांत 3.49 लाख नवे रुग्ण; 2767 जणांचा बळी घेतला

    दिल्ली : दिवसेंदिवस कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत असून लागोपाठ चवथ्या दिवशी देशात कोरोना विषाणूच्या 3 लाखपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. असा प्रकार आजवर जगातील कोणत्याही देशात घडला नाही. रविवारी सकाळपर्यंत देशात 3,49,691 नवे रुग्ण आढळले असून 2767 लोकांचा मृत्यूही झाला आहे. दिल्ली व महाराष्ट्रात मृत्यूदर वाढतच आहे.

    गेल्या तीन दिवसात देशात 7500 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. तर बाधितांची संख्याही रोज विक्रम मोडित काढत आहे. यासोबतच संक्रमणाची एकूण संख्या 1,69,60,172वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 26 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यापैकी 1,40,85,110 रुग्ण पूर्णत: बरे झाले असून देशात आजवर 1,92,311 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रोज 65000 पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात रोज 20000 रुग्ण आढळत आहेत.

    मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, बिहार व बंगालसह 12 राज्यात स्थिती गंभीर झाली आहे.