
पृथ्वीराज साठे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सचिवपदी बढती देत आसाम राज्याची जबाबदारीही सोपवली आहे.
दिल्ली : एका मराठी नेत्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. एका मराठी नेत्यावर पक्षाने मोठा विश्वास दाखवल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोनिया गांधीनी हा निर्णय घेतला आहे.
१९९२ मध्ये एनएसयुआयच्या माध्यमातून पृथ्वीराज साठे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयुच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजयही संपादन केला होता.
त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रसचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या कोअर ग्रुपचे ते सदस्य होते. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वय पदावर असताना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नात्याने पक्षाच्या दैनंदिन कामकाजात तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजन आणि समन्वयात नेहमीच त्यांचे मार्गदर्शन असते. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. पक्ष संघटना बांधणीच्या कामातही त्यांचा हातखंडा आहे. समाजातील विविध लोकांशी, संघटनांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या निश्चितीच पक्षाला फायदा होईल.
पृथ्वीराज साठे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सचिवपदी बढती देत आसाम राज्याची जबाबदारीही सोपवली आहे.