महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत राजधानीत खलबतं, खुर्चीत बसण्यास इच्छुक असणाऱ्यांवर राजकीय वर्तुळाचं लक्ष

विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष पदाबाबत राजधानी दिल्लीमध्ये खलबतं सुरू झाली आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास कोण इच्छुक आहे. यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली.

विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे. वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक असल्याचं समजतं. परंतु इतर दिग्गजही शर्यतीत असल्याने नव्या वारसदाराच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.