पंजाबच्या रुग्णालयातील डॉक्टर पोहोचले सिंघु सीमेवर, शेतकऱ्यांवर उपचार करून देतायत आपलं योगदान

पंजाबमधील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स सध्या सिंघू सीमेवर पोहोचले आहेत. केवळ डॉक्टरच नाही, तर सर्व मेडिकल स्टाफ सिंघू सीमेवर आपली सेवा देण्यासाठी दाखल झालाय यामध्ये वेगवेगळे डॉक्टर आणि नर्सेस यांचाही समावेश आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं काम हे आरोग्य कर्मचारी करताना दिसतायत.

केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सूरू आहे. या आंदोलनात पंजाबमधील वेगवेगळे समाजघटक आपापल्या वतीनं जमेल ते योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंजाबमधील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स सध्या सिंघू सीमेवर पोहोचले आहेत. केवळ डॉक्टरच नाही, तर सर्व मेडिकल स्टाफ सिंघू सीमेवर आपली सेवा देण्यासाठी दाखल झालाय यामध्ये वेगवेगळे डॉक्टर आणि नर्सेस यांचाही समावेश आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं काम हे आरोग्य कर्मचारी करताना दिसतायत.

आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देण्याचं काम तर हे डॉक्टर करत आहेतच. मात्र त्याचसोबत आंदोलनात आजारी पडणाऱ्या रुग्णांना औषधोपचार आणि इतर उपचार पुरवण्याचं कामही हे डॉक्टर करतायत. गेल्या ३ आठवड्यांपेक्षा अधिक काळ आंदोलनस्थळी राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सध्या सुरु आहेत.

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत हे शेतकरी दिवसरात्र ठाण मांडून आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम होत आहे. यातून अनेक शेतकरी आजारी पडत आहेत. मात्र तरीही आंदोलन सोडून ते माघारी जायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं मनोबल कमी होऊ नये आणि आजारामुळे त्यांना माघार घ्यावी लागू नये, यासाठी पंजाबातील डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आलेत.