पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार का ? अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!

भारतीय स्टेट बँकेच्या अर्थविश्लेषकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नुकताच केंद्र सरकारला एक सल्ला दिला होता. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणल्यास त्याचे दर ७५ रुपये लिटर पर्यंत खाली येतील असंही सांगितलं होतं.

    दिल्ली (Delhi).  भारतीय स्टेट बँकेच्या अर्थविश्लेषकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नुकताच केंद्र सरकारला एक सल्ला दिला होता. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणल्यास त्याचे दर ७५ रुपये लिटर पर्यंत खाली येतील असंही सांगितलं होतं. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी उत्तर देत सर्व चर्चांना विराम दिला आहे.

    पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी च्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेकडून शिफारस आल्यास त्यावर विचार केला जात असतो. परंतु, अशा प्रकारची कोणतीही शिफारस जीएसटी परिषदेकडून करण्यात आली नसल्याचं अनुराग ठाकूर यांनी स्पष्टं केलं आहे. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तूर्तास तरी कमी होणार नसल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

    पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतचा सर्वाेच्च उच्चांक गाठला असून शंभरी पार केलेल्या पेट्रोलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास त्याच्या किमती जवळपास 25 रुपयांनी कमी होऊन 75 रुपयापर्यंत खाली येऊ शकतात असं भारतीय स्टेट बँकेच्या अर्थ विश्लेषकांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. महत्त्वाचा महसुलाचा स्त्रोत कमी होण्याची भीती केंद्र सरकारला वाटत असावी आणि यामध्ये राजकीय इच्छाशक्तीही दिसत नसल्याचं भारतीय स्टेट बँकेच्या अर्थ विश्लेषकांनी प्रसिध्द केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    केंद्र आणि राज्य सरकारला आपला महसूल बुडण्याची भीती असल्याने पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणणं कठीण जात आहे. तसेच अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.