१५० जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव; महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये चिंताजनक स्थिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून ‘नॉनस्टॉप’ वाढत असलेली बाधितांची संख्या आणि मृत्यूदरात होत असलेली वाढ पाहू जाता अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला असतानाच आता केंद्रीय आरोग्यमंत्रालयानेही लॉकडाऊनचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास देशातील ७४१ जिल्ह्यांपैकी १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तेथे लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.

    दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून ‘नॉनस्टॉप’ वाढत असलेली बाधितांची संख्या आणि मृत्यूदरात होत असलेली वाढ पाहू जाता अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला असतानाच आता केंद्रीय आरोग्यमंत्रालयानेही लॉकडाऊनचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास देशातील ७४१ जिल्ह्यांपैकी १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तेथे लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.

    पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळेच आरोग्य यंत्रणांवरही ताण पडला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही आठवडे कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत एका अधिकाऱ्याने बैठकीत व्यक्त केले. दरम्यान केंद्राला सादर केलेल्या प्रस्तावात स्थितीत बदल होताच प्रस्तावातही बदल केला जाऊ शकतो मात्र वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.

    महाराष्ट्रात मंगळवारी ६६३५८  रुग्णांची नोंद झाली आहे. तर केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या २४ तासात ३० हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. उत्तरप्रदेशात ३२९२१, केरळ ३२८१९ आणि कर्नाटकात ३१८३०  बाधित आढळले आहेत.

    गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढविणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासात आतापर्यंतच्या सर्वाधिक ३२९३ मृत्यूंची नोंद झाली. हा आजवरचा उच्चांक आहे. तर या २४ तासात ३ लाख ६० हजार ९६० रुग्णांचीही नोंद झाली आहे.

    गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गुरुवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाउन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत.