मोदी मंत्रिमंडळाची ‘सर्जरी’ लवकरच; वाईट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू

19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तर कानपूर दौऱ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंदही राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 59 मंत्री आहेत.

    दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील वाईट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. पुढील काही दिवसांत पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिंमडळात मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाई, तर नव्या आणि तरुण-तुर्क नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

    19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तर कानपूर दौऱ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंदही राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 59 मंत्री आहेत.

    मंत्रीमंडळ विस्तारात पिलीभीतचे खासदार वरुण गांधी, राजस्थानचे सर्वात तरुण खासदार 37 वर्षीय राहुल कांस्वा, लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल, कर्नाटकहून राजीव चंद्रशेखर, दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी, काँग्रसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे आणि बीजेडीतून भाजपत आलेले बी. जे. पांडा हेही दावेदार आहेत.

    रालोआतील 3 पक्षांचे प्रतिनिधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जेडीयू व लोकजनशक्ती पार्टीला प्रतिनिधित्व मिळू शकते. लोजपाचे पशुपतिनाथ पारस व जेडीयूचे आरसीपी सिंह यांना स्थान मिळू शकते. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांचे स्थान पक्के मानले जात आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले दिनेश त्रिवेदीही मंत्रिपदाची अपेक्षा करत आहेत.

    उत्तराखंडातील राजकीय समीकरणांमुळे रमेश पोखरियाल निशंक यांचे शिक्षण मंत्रालय प्रकाश जावडेकर यांना दिले जाऊ शकते. माहिती व प्रसारण मंत्रालय, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शहर व ग्रामविकास आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे प्रमुखही बदलले जाऊ शकतात.