मोदींची नवीन टीम; नारायण राणेंसह कोणाला कोणतं मंत्रीपद मिळाल?

नव्या मंत्रीमंडळात अनेक युवक महिला तसेच मागासवर्गीयांना स्थान देण्यात आले आहे. विस्तारात अनुभवी, व्यावसायिकांवरही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. ज्यात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा नेते सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांना मंत्री बनविण्यात आले आहे. या नेत्यांची सर्वाधिक चर्चाही होती.

    नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटचा बुधवारी सायंकाळी विस्तार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विस्तार मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर रात्री उशीरा खाते वाटप जाहीर करण्यात आले.

    नव्या मंत्रीमंडळात अनेक युवक महिला तसेच मागासवर्गीयांना स्थान देण्यात आले आहे. विस्तारात अनुभवी, व्यावसायिकांवरही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. ज्यात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा नेते सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांना मंत्री बनविण्यात आले आहे. या नेत्यांची सर्वाधिक चर्चाही होती.

    केंद्रीय गृहमंत्री म्हणून मोठी कामगिरी करणाऱ्या अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभारही सोपविण्यात आला आहे. तर महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी अत्यंत मंहत्त्वाचं खातं असलेल्या रेल्वे मंत्रालयावर अशिव्नी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटीतून पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या अश्विनी यांच्याकडे माहिती प्रसारण खातेही सोपविण्यात आले आहे. तर हॉर्व़ड विद्यापीठातून शिकलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालय सोपविण्यात आले आहे.

    महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या नारायण राणे यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सोपविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात हे खाते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आहे. देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, या मंत्रालयावर पंतप्रधानांचे विशेष लक्ष आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे पंचायती राजचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. डॉ. भागवत कराड यांच्याकडे अर्थराज्यमंत्री पद देण्यात आले आहे. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात केंद्रासाठी महत्त्वाचे ठरलेल्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी आता डॉ. हर्षवर्धन यांच्याऐवजी मनसुख मंडाविया हे सांभाळणार आहेत. त्याचबरोबर रसायने आणि खते या खात्याची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे.