महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली; पक्षश्रेष्ठींनी अहवाल मागवला

महाराष्ट्रातील प्रकरणावरुन आता काँग्रेसमध्येही नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. स्वत: राहुल गांधी नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीतील काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आज राज्याच्या घडामोडीचा अहवाल मागवणार आहेत. या प्रकरणात काँग्रेसची नाहक बदनामी होत असल्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भावना आहे.

    दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझेंना अनिल देशमुखांनी १०० कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा हा आरोप आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापतं आहे. विरोधकही महाविकास आघाडी सरकारवर रोज हल्लाबोल करत आहेत.  या प्रकरणावरुन आता काँग्रेसमध्येही नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. स्वत: राहुल गांधी नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीतील काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आज राज्याच्या घडामोडीचा अहवाल मागवणार आहेत. या प्रकरणात काँग्रेसची नाहक बदनामी होत असल्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भावना आहे.

    कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणात आपली प्रतिक्रीया दिली नाही, मात्र या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात म्हणाले होते.

    दरम्यांन दिल्लीत काँग्रेस पक्षामध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत.