Nationwide agitation of Rashtriya Swayamsevak Sangh Pranit Sanghatana BMS on 28th October 2020
रा.स्व. संघटनांचे (BMS) २८ ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदींना तीव्र विरोध केला आहे. या तरतुदी मागे न घेतल्यास २८ ऑक्टोबरला देशभरात निदर्शने करण्याचा इशारा संघाने दिला आहे.

  • मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी तरतुदींना विरोध

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदींना तीव्र विरोध केला आहे. या तरतुदी मागे न घेतल्यास २८ ऑक्टोबरला देशभरात निदर्शने करण्याचा इशारा संघाने दिला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास संप तसेच अन्य पद्धतीने दीर्घकाळ आंदोलन करण्याचे बीएमएसने ठरविले आहे. बीएमएसच्या गेल्या आठवड्यात व्हर्चुअल माध्यमातून झालेल्या राष्ट्रीय परिषदेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता. याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

४ संहितांना विरोध

संसदेने पावसाळी अधिवेशनात औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षासंहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी वातावरण विधेयक ही तीन कामगार संहिता विधेयके मंजूर केली. चौथे, वेतन संहिता विधेयक हे संसदेने ऑगस्ट २०१९मध्ये मंजूर केले आहे. मात्र त्याला अंतिम रूप देण्याची आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या चारही कामगार संहिता डिसेंबरपर्यंत एकाच टप्प्यात लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

‘इशारा सप्ताह’चेही आयोजन

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय परिषदेत सहा ठराव मंजूर करण्यात आले. सरकारने नवीन कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदी रद्द कराव्यात, बीएमएस तसेच अन्य कामगार संघटनांना याबाबत चर्चेसाठी बोलवावे.

१० ते १६ ऑक्टोबर या देशभरात ‘इशारा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा ठरावही परिषदेत करण्यात आला. राष्ट्रीय रोजगार धोरण निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित घटकांची गोलमेज परिषद भरवावी, पेन्शन योजनेचा फेरआढावा घ्यावा.

स्थलांतरित श्रमिक, राष्ट्रीय पातळीवर नोंदणी, सामाजिक सुरक्षा यासंदर्भातील कायद्यांमध्ये प्रभावी दुरुस्त्या करण्याची मागणीही बीएमएसने केली आहे.