राज्यात गृहमंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात करण्यात आलाय. त्यावरून खळबळ उडाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र दिसू लागलंय. त्यामुळे पुढील रणनिती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलीय. 

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडालीय. आतापर्यंत सचिन वाझे आणि शिवसेना यांच्यापुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता राष्ट्रवादीपर्यंत जाऊन पोहोचलंय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चांगलीच खळबळ उडालीय.

    गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात करण्यात आलाय. त्यावरून खळबळ उडाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र दिसू लागलंय. त्यामुळे पुढील रणनिती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलीय.

    अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख हे नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. धनंजय मुंडे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंगाशी येता येता वाचलं. त्या प्रकरणात सुरुवातीला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चेनं जोर धरला होता. मात्र त्यानंतर तक्रारदार महिलेनंच तक्रार मागे घेतल्यामुळे प्रकरण निवळलं होतं. आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यावर आरोप झालेत. अनिल देशमुख यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबतची रणनिती आजच्या दिल्लीतील बैठकीत निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून ते स्वतःचा बचाव करण्यासाठी असे दावे करत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. आपल्याला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देशमुखांनी केलाय.

    आपला दावा सिद्ध कऱण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. आपल्याला पोलीस आय़ुक्तपदावरून हटवणार असल्याचं लक्षात आल्यानंतर लगेच परमबीर यांनी खोटे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी एसीपी पाटील यांना व्हॉट्सअपवरून काही प्रश्न विचारले आणि त्याची त्यांना अपेक्षित असणारं उत्तरं मिळवली. अपेक्षित उत्तरं मिळवण्यासाठी परमबीर सिंग किती अधीर झाले होते, हे त्यांच्या संभाषणावरून दिसून येते, असं गृहमंत्री पाटील यांनी म्हटलंय.