एकाही मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा वेगवेगळ्या 10 राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीला 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही हजेरी होती. मात्र, या बैठकीत मात्र पश्चिम बंगालमधील एकाही जिल्हाधिकाऱ्याचा समावेश नव्हता. तसेच बैठकीत एकाही मुख्यमंत्र्याला बोलू न दिल्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

    दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा वेगवेगळ्या 10 राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीला 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही हजेरी होती. मात्र, या बैठकीत मात्र पश्चिम बंगालमधील एकाही जिल्हाधिकाऱ्याचा समावेश नव्हता. तसेच बैठकीत एकाही मुख्यमंत्र्याला बोलू न दिल्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

    ममतांनी बैठकीनंतर आपली निराशा आणि रोष व्यक्त केला. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवले, बोलण्याची संधीही दिली नाही, असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. राज्यांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल तर त्यांना बैठकीसाठी का बोलावले जाते? असा सवाल उपस्थित करताना, सर्व मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची संधी न दिल्याचा निषेध करायला हवा, असे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या.

    महाराष्ट्र, छत्तीसगड, हरयाणा, केरळ, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील जिल्हाधिकारी आणि फिल्ड अधिकारी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. देशातील रुग्णसंख्येत घट होत आहे, पण आव्हान कायमच आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

    कोरोनाची साथ ही गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती आहे. कोरोनाने तुमच्यासमोर आव्हाने आणखी वाढवली आहेत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वात मोठे योद्धे आहात आणि गावागावात असा संदेश द्यायचा आहे की गावाला कोरोनामुक्त ठेवायचे आहे. आपल्याला बराच काळ जनजागृती करावी लागणार आहे. एका लसीचा अपव्यय म्हणजे एका आयुष्याला आवश्यक ते सुरक्षा कवच प्रदान करण्यात अपयश. यामुळे लसीचा अपव्यय टाळा असे पंतप्रधान मोदी म्हणाले.