अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली (Delhi).  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि अल कायदाचा ठार दहशतवादी ओसामा बीन लादेन यांच्यात काय साम्य आहे? बरं तर या लोकांच्या यादीत सोनम कपूरला स्थान असायला हवे का? असा प्रश्‍न विचारल्यावर कोणीही गोंधळून जाणार. मात्र आपल्या देशातल्या काही यंत्रणांचा असा गोंधळ होत नाही. त्यांना असे प्रश्‍न पडतही नाहीत. त्याचे असे आहे की, उत्तर प्रदेशातील एका गावात हे सर्व चर्चित चेहरे मतदार आहेत. यंत्रणेत झालेल्या गडबडीमुळे एका झटक्यात या दिग्गजांना गावातील मतदार बनवले आहे.

उत्तर प्रदेशातील सिध्दार्थ नगर जिल्ह्यातील भैसहिया या गावात हा चमत्कार झाला आहे. या छोट्या गावातील मतदारांची नावांची यादी पाहिली तर भल्याभल्यांना भोवळ येईल. कारण यातली काही नावे अशी आहेत की ती अतिमहत्वाच्या व्यक्तींची आहेत. या व्यक्ती या लहान गावात कशाला मतदानासाठी येणार असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकतो. मात्र यंत्रणेतील विद्वानांना नाही. उत्तर प्रदेशचे दोन माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि मायावतीही याच गावातील मतदार आहेत. ते येथेच मतदानाचा हक्क बजावतात. बरे त्यातल्या त्यात त्यांचे ठिक. त्यांना बिचाऱ्यांना मतदानासाठी राज्याबाहेर जावे लागत नाही. मात्र अन्य लोकांचा काय?

सोनम कपूर फोटो

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आपले राज्य सोडून तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा यांना चक्क आपला देश सोडून येथे यावा लागत असेल. बिचाऱ्या अल कायदाच्या लादेनचे काय? तो कुठुन आणि कसा येत असेल? सोनम कपूरसोबतच या यादीत सोनू हे अन्य नाव आहे. ते सोनू सूदचे आहे की, सोनू निगमचे आहे याचा खुलासा संबंधित तज्ञ मंडळीच करू शकतील. काही काळापूर्वी रेशन कार्डधारकांच्या यादीत सगळ्या व्हिआयपींची नावे सापडली होती. एका महाभागाने तर तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनाच समन्स बजावले होते. आता तर यंत्रणेने देशी- विदेशी असा कोणताच भेदभाव न करता सगळ्यांना आपले मतदार करून टाकले आहे.