‘मग…असे तोकडे कपडे घालणं शोभतंय का?’ म्हणत फाटक्या जीन्सच्या वादात प्रियांका गांधींची उडी; मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो केले शेअर

प्रियंका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या जुन्या पोशाखातील खाकी हाफ चड्डी परिधान केलेले फोटो शेअर करत 'अरे देवा... यांचे गुडघे दिसत आहेत की...', असे कॅप्शन दिले आहे.

    नवी दिल्ली:  उत्तराखंडच्या मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी महिलांनी फाटलेली जिन्स घालणं म्हणजे संस्कार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनेही या विधानावर आपले रोकठोक मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीनीही या वादात उडी घेत रावत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    प्रियांका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या जुन्या पोशाखातील खाकी हाफ चड्डी परिधान केलेले फोटो शेअर करत ‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत की…’, असे कॅप्शन दिले आहे.

    आजकाल महिला फाटलेली जिन्स घालून फिरताना दिसतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहानांना लागणारे संस्कार हे मोठ्यांकडून येत असतात, असे विधान रावत यांनी बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना केले होते. त्यानंतर सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी या विधानावर आक्षेप घेत ट्रोल केले होते.