सावधगिरी बाळगली तरच… पर्यटनस्थळांवरील गर्दीवर मोदींची नाराजी

  दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्य भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या बैठकीमध्ये यात आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदींनी संभाव्य तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली. हिल स्टेशन, मार्केटमध्ये विना मास्क आणि कोरोना नियमांचे पालन न करता गर्दी होणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

  तिसरी लाट येण्यापूर्वी आनंद उपभोगणार असल्याचे काही लोकं छाती फुगवून सांगतात. तिसरी लाट आपोआप येणारी नाही हे त्यांनी समजून घ्यावे. ती कशी थांबवायची, नियमांचे पालन कसे करायचे यावर विचार करायला हवा. कोरोना आपोआप येत नाही. कोणी घेऊन आला तरच तो येतो. सावधगिरी बाळगली तरच लाट रोखता येईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  सहा सूत्रांचा अवलंब

  1. प्रतिबंध व उपचार – विषाणूच्या प्रत्येक प्रकारावर नजर ठेवावी लागेल. सूक्ष्म पातळीवर जाऊन कठोर पावले उचलावी लागतील. डेल्टा व्हेरिएंट किती धोकादायक आहे यावर तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे. प्रतिबंध आणि उपचार हे अधिक महत्वाचे आहे.

  2. अनुभवाचा वापर – हेमंत बिस्वा सरमा सांगत होते की, त्यांनी आपल्या राज्यात 6 हजारांपेक्षा जास्त मायक्रो-कंटेन्टमेंट झोन तयार केले. यामुळे जबाबदारी निश्चित होते. गेल्या दीड वर्षापासून या साथरोगाशी लढत आहोत त्यामुळे आपल्या अनुभवाचा वापर करत ही लाट थांबवावी लागेल.

  ३. लसीकरणचा वेग वाढविणे – बेसावधपणा, हलगर्जीपणा व गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढू शकते त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलावे लागेल. गर्दी रोखावी लागेल. लसीकरणालाही वेग आवश्यक असून सेलिब्रिटी, धर्म, शिक्षण क्षेत्राशी संबंधि व्यक्तींनी जागरूकता करावी.

  4. नव्या आरोग्य पॅकेजचा उल्लेख – नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नॉर्थ इस्टमधील प्रत्येक राज्याला या पॅकेजमधून हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत मिळेल.

  5. ईशान्य राज्यांसाठी 150 ऑक्सिजन प्लांट – देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारले जात असून ईशान्य राज्यांसाठी 150 प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. कोणतीही अडचण न येता ते लवकर उभारल जाईल. भौगोलिक स्थिती पाहून अस्थायी रुग्णालयही स्थापन करावे.

  6. चाचणी क्षमता वाढविणे – आयसीयू बेड, ऑक्सिजन पेड, नव्या रुग्णालयांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल. देशभरात रोज 20 लाख चाचणी करण्याची क्षमता आहे. ईशान्य राज्यातही चाचण्यांचा वेग वाढवावा लागेल.

  सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत 16 रोजी चर्चा

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 16 जुलै रोजी देशातील सहा मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.