रामदेवबाबांसोबत आमचे व्यक्तिगत वैरनाही ; विधान मागे घेतल्यास पोलीस तक्रारही मागे घेणार: आयएमए

ज्या व्हिडिओमुळे रामदेवबाबांविषयी वाद निर्माण झाला होता, ते विधान मागे घेत त्यांनी दिलगिरीही व्यक्‍त केली होती. पण नंतरही रामदेवबाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधुनिक उपचार पद्धतीला आक्षेप घेणारी विधाने चालूच ठेवली आहेत.

    नवी दिल्ली: आमचे रामदेवबाबांशी व्यक्‍तिगत शत्रुत्व नाही. त्यांनी ॲलोपॅथी आणि आधुनिक उपचार पद्धतीविषयीची आपली आक्षेपार्ह विधाने मागे घेतली तर त्यांच्या विरोधातील पोलीस तक्रारही आम्ही मागे घेऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. जे. ए. जयलाल यांनी म्हटले आहे.

    रामदेवबाबांनी अनेक अशास्त्रीय विधाने केली आहेत. त्यांनी कोविड लसीकरणाच्या विरोधात जे विधान केले आहे त्यातून लोकांमध्ये गैरसमज पसरण्याचा धोका आहे. रामदेवबाबांना मोठे अनुयायी आहेत, त्यांच्यात त्यांच्या विधानांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो ही आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आमचे त्यांच्याशी व्यक्तीगत काहीही देणेघेणे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    ज्या व्हिडिओमुळे रामदेवबाबांविषयी वाद निर्माण झाला होता, ते विधान मागे घेत त्यांनी दिलगिरीही व्यक्‍त केली होती. पण नंतरही रामदेवबाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधुनिक उपचार पद्धतीला आक्षेप घेणारी विधाने चालूच ठेवली आहेत.

    इंडियन मेडिकल असोसिएशनला त्यांनी जाहीरपणे २५ प्रश्‍नही विचारले आहेत. त्यातून हा वाद वाढत चालला आहे. त्यावरून असोसिएशनने रामदेवबाबांना बदनामीची नोटीस जारी करून त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारही दाखल केली आहे. कोणाचा बाप आपल्याला अटक करू शकत नाही, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. त्यातून रोजच परस्परविरोधी विधाने सुरू आहेत.