Savarkar Controversy

  दिल्ली : स्वातंत्र्यानंतर विनायक सावरकर यांच्या बदनामीसाठी मोहीम चालिवण्यात आली होती(Savarkar Controversy), असा आरोप सरसंघचालकांनी केल्यानंतर संक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशात राजकीय रणकंदन माजल्याची स्थिती उद्भवली आहे. महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केले होते.

  यासोबतच स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे योगदान काही ठराविक विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले असून ते आता सहन केले जाणार नसल्याचा इशारादेखील त्यांनी दिला होता. त्यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तोफ डागली. असेच जर सुरू राहिले तर सावरकरांना राष्ट्रपिता ठरविले जाईल, अशी टीका त्यांनी केली.

  ते विकृत केलेला इतिहास लोकांसमोर मांडत आहेत. हे जर असंच सुरु राहिलं तर ते महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता ठरवतील, जे महात्मा गांधींच्या खुनातील आरोपी होते आणि ज्यांच्यावर न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या चौकशीमध्ये दोषी ठरवण्यात आले होते असे एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

  काँग्रेसचाही निशाणा

  काँग्रेसने सिंह यांच्यासहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींबद्दल चुकीची माहिती न पसरवण्याचं आवाहन करतानाच काँग्रेसने मोदींच्या फोनवरुनच महात्मा गांधी आणि सावरकरांचं बोलणं झाले असावे असा टोमणा हाणला. जेव्हा जगामध्ये डिजीटल कॅमेरा नव्हता तेव्हा मोदींनी डिजीटल कॅमेराने फोटो काढला होता, जगामध्ये ईमेल नव्हता तेव्हा त्यांनी ईमेल वापरला होता. त्याचप्रमाणे कदाचित मोदींजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील, की तुम्ही माफी मागा, अशा शब्दात काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी निशाणा साधला.

  महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच पिटीशन

  सावरकरांच्या विरोधात खूप खोटं पसरवले गेले आहे. वारंवार हे सांगितले गेले की, त्यांनी इंग्रजांसमोर अनेकदा क्षमायाचना करत मर्सी पिटीशन्स दाखल केल्या. मात्र वास्तव हे आहे की, या मर्सी पिटीशन्स त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैदीला असा अधिकार असतो की, त्याची इच्छा असेल तर तो मर्सी पिटीशन दाखल करु शकतो. महात्मा गांधींनीच त्यांना सांगितले होते की तुम्ही मर्सी पिटीशन्स दाखल करा. त्यांच्या सांगण्यावरुनच सावरकरांकडून या पिटीशन्स दाखल करण्यात आल्या. गांधीनी असे म्हटले होते की, ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

  गांधी त्यांना इतके खटकतात की, कोणतीही बाब असूद्या गांधींचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे पाऊल पडत नाही. यांचीच मजबुरी महात्मा गांधी आहे आणि त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यांच्यावर गांधींचा इतका मोठा प्रभाव आहे ही गोष्ट छान आहे. ज्या विचारधारेने गांधीजींची हत्या घडवून आणली त्या विचारधारेचे लोक कोणतीही बाब असू द्या महात्मा गांधीचे नाव घ्यावे लागते. सावरकरांचे उदात्तीकरण करताना पण त्यांना महात्मा गांधीचा आधार घ्यावा लागतो.

  - तुषार गांधी, महात्मा गांधींचे वंशज