पटोले होणार प्रदेशाध्यक्ष! विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज

काँग्रेस नेतृत्वाने पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून आगामी दोन-तीन दिवसात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद सोपविले जाण्याचीही चर्चा आहे.

दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नाना पटोले यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून आगामी दोन-तीन दिवसात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद सोपविले जाण्याचीही चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होताच हे पद रिक्त होणार आहे.

सातव यांना दिल्ली सोडण्यास मनाई
यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावे होती परंतु पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची धुरा राहुल गांधींच्या हाती येणार असल्याच्या शक्यतेने हायकमांडने राजीव सातव यांना दिल्ली सोडण्यास मनाई केली आहे. विजय वडेट्टीवार यांचा एक गट दिल्लीत सक्रीय होता परंतु हायकमांडने अखेर नाना पटोलेंच्या नावावरच शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते.

थोरात यांच्याकडे होती तीन पदे
बाळसाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळात पक्षनेता म्हणून तीन जबाबदाऱ्या होत्या. तसेही थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत ४४ जागांसह सन्मानजनक जागा पटकावल्या होत्या. परंतु तीन पक्षांची आघाडी असलेल्या सरकारमध्ये काँग्रेस कमकुवत होत असल्याचे आरोप केले जात होते. त्यामुळे पक्षात थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुढील रणनीती कशी आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.