पवारांचे तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच ; विरोधी पक्षात काँग्रेस एकाकी!

या नेत्यांनी केवळ ममतादीदींना पाठिंबा दिला नाही तर त्यांनी ममतादीदींसाठी प्रचार करण्याची तयारीही दर्शवली आहे. पवारांच्या प्रयत्नामुळेच विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक प्रचारासाठी व्यापक रणनीती तयार केल्याची चर्चा आहे.

    दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे कालच संकेत दिले आहे. पवारांनी अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एककी पडणार की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचे विधान केले होते. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीला आकार दिला नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

    ५ राज्यांच्या निकालावर लक्ष

    दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचे बरेचसे भवितव्य अवलंबून आहे.

    दीदींसाठी प्रचार करण्याची तयारी

    मोदींना रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. या नेत्यांनी केवळ ममतादीदींना पाठिंबा दिला नाही तर त्यांनी ममतादीदींसाठी प्रचार करण्याची तयारीही दर्शवली आहे. पवारांच्या प्रयत्नामुळेच विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक प्रचारासाठी व्यापक रणनीती तयार केल्याची चर्चा आहे.