सिरम इन्स्टिट्युट की फायझर कंपनी ? भारतात  कोणत्या लसीला मिळणार पहिल्यांदा परवानगी

दिल्ली : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही परवानगी मागितली असल्याने आता कोणत्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

कोविशिल्ड लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येऊ शकते. तर, फायझर लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमान लागते. या लसीसाठी साठवणुक यंत्रणा उभी करणे भारतासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे कोविशिल्ड या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.

फायझर या औषध निर्माता कंपनीच्या लसीची परिणामकारकता ९५ टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ब्रिटनसह बहारीनमध्ये या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.

तर, अमेरिकेसह भारतात लसीकरणासाठी परवानगी मागण्यात आली आहे. भारतामध्ये परवानगी मागणारी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ सिरमनेही औधष महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे.

कोविशिल्ड लसीची परिणामकारकताही ९० टक्के असल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने केला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही लसींमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण, फायझरसाठी भारतातील लसीकरण आव्हानात्मक ठरणार आहे.