भारतात जुलैमध्ये येणार फायझरची लस, भारतीयांना उपलब्ध होणार चौथा पर्याय

भारतात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसी उपलब्ध आहेत. त्यातही स्पुटनिकची उपलब्धता मर्यादित असून जुलैपासून या लसीचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता फायझरची लस जुलै महिन्यात भारतीयांना उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. सध्या त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

    जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून लसीकरण हाच त्यावरचा एकमेव पर्याय असल्याचं आता सिद्ध झालं आहे. भारतात लसीकरणाचा वेग मंदावला असून लसींबाबत चुकलेलं धोरण हेच त्याचं कारण असल्याचंही आता समोर येत आहे. आता केंद्र सरकारनं लसींची उपलब्धता वाढवण्यासाठी हातपाय हलवायला सुरुवात केली असून लवकरच फायझरची लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

    भारतात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसी उपलब्ध आहेत. त्यातही स्पुटनिकची उपलब्धता मर्यादित असून जुलैपासून या लसीचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता फायझरची लस जुलै महिन्यात भारतीयांना उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. सध्या त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

    केंद्र सरकार आणि फायझर कंपनी यांच्यात याबाबत चर्चा सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पुढील एक ते दोन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ लस भारतात येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या भारत सरकार आणि फायझर यांच्यात कुठलाही करार मात्र झालेला नाही. या कराराची बोलणी अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकरच कागदोपत्री करार होण्याची शक्यता आहे.

    यापूर्वीही फायझरनं भारतात लसींचा पुरवठा कऱण्याची तयारी दर्शवली होती. मात्र केंद्र सरकारने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि भारतातील नागरिकांवर चाचणीची अट घातल्याने फायझरने आपला अर्ज मागे घेतला होता. आता पूर्वीच्या अटी मागे घेत भारत सरकारने पुन्हा एकदा फायझरसोबत बोलणी सुरू केली आहेत.