कोरोनाची लस निवडणे हे काँग्रेस अध्यक्ष निवडण्याइतके सोपे काम नाही, भाजपचा राहुल गांधींना टोला

गांधी-नेहरू घराण्यात एखादी व्यक्ती जन्माला आली की तिची गुणवत्ता आणि क्षमता न तपासताच तिला अध्यक्षपदी बसवलं जातं. मात्र कोरोनाच्या लसीची निवड त्या पद्धतीनं होऊ शकत नाही. सर्व उपलब्ध लसींची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासूनच लसीची निवड केली जाईल, असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीबाबतचे धोरण जाहीर करावे, ही काँग्रेस नेते राहुल गांधींची मागणी फेटाळून लावताना भाजपनं जोरदार टोला लगावला आहे. कोरोना लसीची निवड करणं हे काँग्रेस अध्यक्षाची निवड करण्याएवढं सोपं नाही, असं म्हणत भाजपनं राहुल गांधींची खिल्ली उडवलीय.

गांधी-नेहरू घराण्यात एखादी व्यक्ती जन्माला आली की तिची गुणवत्ता आणि क्षमता न तपासताच तिला अध्यक्षपदी बसवलं जातं. मात्र कोरोनाच्या लसीची निवड त्या पद्धतीनं होऊ शकत नाही. सर्व उपलब्ध लसींची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासूनच लसीची निवड केली जाईल, असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

“प्रिय राहुल गांधी, तुम्ही गोव्यात तुमची सुट्टी एंजॉय करा. या गोष्टी समजणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे”, असं भाजपचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख विजय चौथाईवाले यांनी म्हटलंय.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारले होते. भारत सरकार कोरोनावरील कुठली लस घेणार आहे? ती घेण्यामागे काय कारण आहे? ही लस पहिल्यांदा कुणाला मिळणार आणि त्यासाठी काय निकष असणार? जनतेचा मोफत कोरोना लस मिळावी यासाठी पीएम केअर फंडातील निधीचा उपयोग होणार का? आणि भारतीयांना नेमकी कधी लस उपलब्ध होणार? असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधानांची कोरोना लसीच्या व्यवस्थापन आणि वितरणासंदर्भात एक बैठक घेतली होती. पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार, पाच कोरोना लसी या ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. त्यातील ३ ते ४ लसी या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर आहेत. तर एक लस ही पहिल्या टप्प्यावर आहे.