PM किसान निधीमध्ये गडबड-घोटाळा;  UIDAI च्या माजी प्रमुखांच्या खात्यात जमा झाले पैसे

ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे. यात विशेष बाब म्हणजे आता थेट आधारकार्डांसंदर्भातील सर्व कामकाज पाहणाऱ्या युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी प्रमुख राम सेवक शर्मा यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिल्ली: गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मात्र या योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अनेक ठिकाणी अपात्र लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात. आता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे. यात विशेष बाब म्हणजे आता थेट आधारकार्डांसंदर्भातील सर्व कामकाज पाहणाऱ्या युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी प्रमुख राम सेवक शर्मा यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नावाची नोंदणी नाही

एका वर्षामध्ये तीनवेळा शर्मा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पीएम सन्मान निधी अंतर्गत एकूण ६००० रुपये पाठवण्यात आले आहेत. या योजनेसाठी शर्मा यांनी आपले नाव नोंदवलेले नसतानाही या योजनेअंतर्गत त्यांचा खाते क्रमांक नोंदवण्यात आला आहे. राज्य सरकार यासाठी जबाबदार असून पैसे पाठवण्यापूर्वी त्यांनी खाते क्रमांकाशी संबंधित कोणतीही तपासणी केली नसल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.
माझ्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत दोन हजार रुपयांचा निधी तीन हफ्त्यांमध्ये जमा झाल्याची माहिती शर्मा यांनी दिली. हे पैसे शर्मा यांच्या नावाने असणाऱ्या ज्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. ते खाते ८ जानेवारी २०२० रोजी सुरु करण्यात आले आहे. नऊ महिने हे खाते सुरु राहिले आणि नंतर २४ सप्टेंबरला ते बंद करण्यात आले. या खात्यानुसार उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणून शर्मा यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. आपल्या नावाने खाते सुरु करण्यात आले आहे हे शर्मा यांना समजले, तेव्हा त्यांनीच बँकेला यासंदर्भातील माहिती दिली. पण त्यावर बँकेकडून काहीही उत्तर आले नाही. पण शर्मा यांच्या नावाने बँकेने सुरु करण्यात आलेले खाते बंद केले.

दरम्यान, अभिनेता भगवान हनुमान, आयएसआय गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावानेसुद्धा पीएम किसान योजनेची खाती बनली आहेत. त्यांची आधारकार्ड उपलब्ध आहेत. हनुमानच्या खात्यात सहा हजार, महबूब अख्तरच्या खात्यात चार हजार तर रितेश देशमुखच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.