आज पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोना लसीचं असं होणार नियोजन

संपूर्ण देशभरात लवकरच कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात कशा प्रकारे लसींचं वितरण होणार, याची चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे. राज्यातील लोकसंख्येनुसार कोरोना लसींचं वितरण आणि लस देण्यासाठीचा अग्रक्रम या दोन मुख्य बाबींवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत पंतप्रधान ऐकून घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. कोरोनाची प्रत्येक राज्यातील स्थिती आणि कोरोना लसीच्या वाटपाबाबतचं धोरण यात निश्चित केलं जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात येईल.

संपूर्ण देशभरात लवकरच कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात कशा प्रकारे लसींचं वितरण होणार, याची चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे. राज्यातील लोकसंख्येनुसार कोरोना लसींचं वितरण आणि लस देण्यासाठीचा अग्रक्रम या दोन मुख्य बाबींवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत पंतप्रधान ऐकून घेणार आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातील कोरोना रुग्णवाढीचा दर ओसरला आहे. मात्र तरीही वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची वेगवेगळी स्थिती आहे. काही राज्यांत कोरोनाचं संकट अधिक गंभीर आहे, तर काही राज्यांत तुलनेने कमी रुग्ण आहेत. त्या त्या राज्यांची भौगोलिक परिस्थिती, वातावरण, शहरी आणि ग्रामीण भागांचं प्रमाण आणि लोकसंख्येची घनता अशा विविध बाबींनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येत फरक पडताना दिसत आहे.

पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर कोरोना लस वितरणा प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. धोरण ठरल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने पावलं पडायला सुरुवात होईल, असं सांगितलं जातंय.