प्रशांत किशोरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश? राहुल गांधींची ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी या बैठकीत काँग्रेस नेत्यांसमोर मांडला आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला मान्यता मिळाल्यास, त्यांच्याकडे एखादी महत्त्वाची जबाबदारी काँग्रेस सोपवू शकते. दरम्यान त्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी १५ जुलै रोजी आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची रणनिती काय असावी? याबाबत एक प्रेझेंटेशन गांधी कुटुंबीयांसमोर सादर केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला आहे.

  दिल्ली : निवडणुकांचे रणनितीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच किशोर यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र असे असले तरी देखील किशोर यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे मात्र किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राहुल गांधी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

  काँग्रेसमध्ये चर्चा

  किशोर हे पक्षात प्रवेश करणार का? यावर अद्याप तरी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षात चर्चा सुरू असून, याबाबत राहुल गांधी यांची प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. एँटनी, मलिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाळ‌, कमलनाथ आणि अंबिका सोनी हे नेते उपस्थित होते.

  लवकरच होणार अधिकृत घोषणा

  सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी या बैठकीत काँग्रेस नेत्यांसमोर मांडला आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला मान्यता मिळाल्यास, त्यांच्याकडे एखादी महत्त्वाची जबाबदारी काँग्रेस सोपवू शकते. दरम्यान त्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी १५ जुलै रोजी आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची रणनिती काय असावी? याबाबत एक प्रेझेंटेशन गांधी कुटुंबीयांसमोर सादर केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे अनेक नेते प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी उत्सुक असून, किशोर यांच्या पक्षात येण्याने काँग्रेसला फायदाच होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत आता लवकरच राहुल गांधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.