भारतात कुपोषण आणि लठ्ठपणा दोन्हींत वाढ, राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतातील एकूण २२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याबाबतचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे निम्म्या लोकसंख्येचा यात समावेश होता. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशचा यात समावेश नव्हता. देशातील लहान मुलांमध्ये कुपोषण आणि लठ्ठपणा वाढत चालल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलंय.

आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयानं २०१९-२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचे तपशील आता जाहीर करण्यात आलेत. देशातील कुपोषणाचं प्रमाण गंभीर असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्याचवेळी देशातील लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचंही यात म्हटलंय. देशातील हा विरोधाभास चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

भारतातील एकूण २२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याबाबतचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे निम्म्या लोकसंख्येचा यात समावेश होता. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशचा यात समावेश नव्हता. देशातील लहान मुलांमध्ये कुपोषण आणि लठ्ठपणा वाढत चालल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलंय.

यापूर्वी २०१५-१६ साली केलेल्या सर्वेक्षणात देशातील कुपोषणाची समस्या कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र शनिवारी प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालात मात्र हे प्रमाण वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. नॉर्मल उंचीपेक्षा कमी उंची असणाऱ्या मुलांचं प्रमाण १३ राज्यांमध्ये वाढलेलं आहे. तर १२ राज्यांतील मुले ही अपेक्षित वजनापेक्षा कमी वजनाची आहेत.

सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार बिहारमध्ये कुपोषण आणि लठ्ठपणाची सर्वाधिक समस्या आहे. गुजरात दुसऱ्या स्थानी तर कर्नाटक तिसऱ्या स्थानी आहे. कमी वजन असणाऱ्या बालकांचं सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राखालोखाल गुजरात आणि बिहारचा नंबर लागतो.

एकूण १६ राज्यांत मुलांचं कमी वजन ही समस्या आहे. तर २० राज्यांत मुलांचा लट्ठपणा ही समस्या आहे. लठ्ठपणा आणि रक्त कमी असण्याचं प्रमाण वाढत चालल्याचं या अहवालात  निरीक्षण नोंदवण्यात आलंय. सर्वेक्षण केलेल्या २२ राज्यांपैकी १९ राज्यांतील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललंय, तर १६ राज्यांतील महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या गंभीर बनलीय. जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक पुरुष लठ्ठ आहेत, तर कर्नाटकमध्ये सर्वाधिक महिला लठ्ठ आहेत.