जुलै आला, पण लस कुठंय ? कोरोना लसीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या या ट्विटनंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना लसीवर क्षुद्र राजकारण करू नये असे आवाहन केले आहे

    नवी दिल्ली : कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जुलै आला, लस आली नाही, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

    देशातील प्रत्येक नागरिकास लवकरात लवकर कोरोना लस देण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या कोरोना संकटापासून लोकांना वाचविता येईल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना लसीवर क्षुद्र राजकारण करू नये असे आवाहन केले आहे.

    केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, मी कालच जुलै महिन्यात लस उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींची समस्या काय आहे? ते वाचत नाहीत का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरसची कोणतीही लस नाही. काँग्रेसने आपल्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या हाताळणीवर लक्ष देण्याची गरज आहे.