संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर

संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    नवी दिल्ली:  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोदी सरकारविरोधात अनेक प्रश्नांवरून टीकास्त्र सोडले जात आहेत. महागाई, इंधन दरवाढ, पॅगेसस हेरगिरी, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन प्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात टीकास्त्र सोडले जात असून, गोंधळामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले आहे. दरम्यान, राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका, असं सांगत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

    आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करावी. संसदेचा आणखी वेळ फुकट घालवू नये, या शब्दांत टीका केली आहे.